शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

वक्तव्य करताय..? जरा जपून...!

गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि संघ दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या वक्तव्यांचे पडसाद देशभरात उमटले आहेत. कोणतेही वक्तव्य जपून करणे गरजेचे आहे.
राजकारण म्हटले म्हणजे त्यात पक्ष, व्यक्ती अथवा संबंधित विषय, घटनेच्या थोडक्यात उल्लेख करायचा झाल्यास एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे, वक्तव्ये करणे, पदच्युत होणे, पक्षातून हकालपट्टी, निलंबन हे ओघाने आलेच. अनेकदा केवळ कारणासाठी, पैशासाठी, विरोधक म्हणून किंवा विरोधकाने विरोध केलाच पाहिजे या भूमिकेतून विरोध केला जातो. बर्‍याचदा संबंधित पदाधिकारी, कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी, निलंबन होणे असे प्रकार सर्रासपणे होतात. यात क्वचित विरोधक बघ्याची भूमिका सुद्धा पार पाडतात. पक्षातून हकालपट्टी झालेला कार्यकर्ता, पदाधिकारी अथवा संबंधित व्यक्ती नंतर जाहीर सभा, पत्रकार परिषद, वर्तमानपत्रातून लेखी निवेदनाद्वारे, स्वतःच निषेधाच्या माध्यमातून विविध आरोप करताना दिसतात. अनेकदा त्याच पक्षात, ठिकाणी चाललेल्या गैरव्यवहार, दुरुपयोग, भ्रष्टाचार, दंडूकेशाही, दडपशाही, धाक-दपटशा इत्यादीविषयी नंतर अगदी घसा फुटेपर्यंत माहिती सांगितली जाते.
पक्षात किंवा त्या क्षेत्रात कार्यरत असताना देखील सुरू असलेला भ्रष्टाचार अशा लोकांना दिसत नसेलच. मात्र तिथून निघाल्यावरच हे सर्वकाही दिसत असावे. कदाचित सावली अथवा छत्रछाया दूर झाल्यामुळे, अवकृपा झाल्यामुळे हे होत असावे. मध्यंतरी राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपानंतर प्रचंड गदारोळ झाला. यानंतर संघाचे के. सुदर्शन यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटले असून आंदोलन, निषेध करण्यात आला. कोणीही वैयक्तीक किंवा संघटनात्मक, पक्षाविरुद्ध, संस्थेविरुद्ध निषेध नोंदविण्यासाठी वक्तव्य करताना विषय संवेदनशील होणार नाही, प्रसंगी अघटित घटना देखील घडून देशाचे नुकसान, हानी होणार नाही याचे भान ठेवणे ही काळाची गरज ठरली आहे. ।।..वादे वादे जायते लठ्ठ-लठ्ठी...।। हे ब्रीद समाजातल्या प्रत्येक घटकाने, त्यातल्या त्यात बुद्धीजीवी मंडळींनी तरी लक्षात ठेवल्यास लाभच आहे, हे ही नसे थोडके.!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, ता. ११- महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. सर्व लोकांना सोबत घेऊन जाण्याचे आपले धोरण असून केवळ बोलण्याऐवजी कृतीवर भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजभवनावरील शपथविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पवार यांनी नूतन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत मणिभवन आणि चैत्यभूमी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यानंतर मंत्रालयात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्यसचिव, अप्पर मुख्यसचिव, सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. सुमारे दीड तास ही बैठक चालली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. नागपूर येथे होणार्‍या आगामी हिवाळी अधिवेशनाचीही चर्चा करण्यात आली.

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

महाराष्ट्रात ४० वर्षात २० मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस १ मे १९६० पासून ११ नोव्हेंबर २०१० पर्यंत राज्याने एकूण २० (वीस) मुख्यमंत्री पाहिले..कारकीर्द पुढीलप्रमाणे:

१) यशवंतराव चव्हाण - १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
२) मारोतराव कन्नमवार - २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
३) वसंतराव नाईक - ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५
४) शंकरराव चव्हाण - २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७
५) वसंतदादा पाटील - १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८
६) शरद पवार - १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
७) अ. र. अंतुले - ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
८) बाबासाहेब भोसले - २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
९) वसंतदादा पाटील - २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५
१०) शिवाजीराव निलंगेकर - ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६
११) शंकरराव चव्हाण - १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८
१२) शरद पवार - २६ जून १९८८ ते २५ जून १९९१
१३) सुधाकरराव नाईक - २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३
१४) शरद पवार - ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५
१५) मनोहर जोशी - १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
१६) नारायण राणे - १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
१७) विलासराव देशमुख - १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३
१८) सुशील कुमार शिंदे - १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४
१९) विलासराव देशमुख - १ नोव्हेंबर २००४ ते ५ नोव्हेंबर २००८
२०) अशोक चव्हाण - ४ डिसेंबर २००८ ते आज (ता. ११ नोव्हेंबर) पर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री

२१) पृथ्वीराज चव्हाण - शपथविधी होणे बाकी (११ नोव्हेंबर २०१०) ते

बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

चव्हाण, पवार - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस  पृथ्वीराज चव्हाण यांची तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची वर्णी लागली आहे. चव्हाण यांची प्रतिमा अद्याप स्वच्छ असल्यामुळे आणि पक्षात त्यांचे वजन असल्यामुळे त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. अशोक चव्हाण हे आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळ्यात अडकल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद गमवावे लागले. आज सकाळी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उपमुख्यमंत्री पदावर राज्याचे जलसंपदा व ऊर्जामंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार यांची निवड करण्यात आली.
काहीही असले तरीसुद्धा पुन्हा एकदा आणखी एका "चव्हाण" यांचीच वर्णी लागली आहेच..।

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

आदर्श गृहनिर्माण संस्था- चौकशीने काय साध्य होणार?

आदर्श गृहनिर्माण संस्थेत आपल्या नातेवाईकांना घरे मिळवून दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशोक (सध्याच्या प्रथेनुसार अशोकराव) चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी विरोधकांनी केली आहे, परंतु चौकशी झाली तरी नेमके काय साधणार आहे, ही बाब अनुत्तरित आहे.
मुंबई येथे आदर्श सोसायटी ज्या भूखंडावर उभी आहे, तो भूखंड संरक्षण दलाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. कारगिलमधील शहिदांच्या कुटुंबीयांसाठी असलेल्या या सोसायटीतील सदनिकांवर राजकीय नेते, तसेच लष्करी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी डल्ला मारल्याच्या या प्रकरणाची गंभीर दखल संरक्षणमंत्र्यांनी घेतली. त्यांच्या आग्रहामुळेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही हात असल्याचा आरोप झाल्यानंतर श्री. चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे यापूर्वीच राजीनामा पाठविला होता. राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्याकडे पाठविण्यात आला असून चव्हाण यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगण्यात आले आहे. अनेकदा विविध प्रकरणांमध्ये मोठमोठे मंत्री, अधिकारी, पदाधिकारी, त्यांचे आप्त-स्वकीय गुंतले असल्याचे निष्पन्न होते. हे प्रकरण कारगिल शहिदांच्या कुटुंबीयांच्या सदनिकांचे असल्यामुळे चव्हाण यांना राजीनामा देणे भाग पडले, हा भाग निराळा. आपण निर्दोष असल्याचे चव्हाणांनी जरी सांगितले असले, तरीही इतक्या मोठ्या प्रकरणाची त्यांना अजिबात कुणकुण लागली नसेल काय? परवानगीपेक्षा जास्त मजले चढविण्यात आलेल्या या सदनिकेसाठी मोठ्या प्रमाणावर वाटे-हिस्से सुद्धा पडले असणारच. चव्हाण यांना बाजूस सारून काँग्रेस Mr. Clean असल्याचे दर्शवून आगामी निवडणुकांमध्ये, भ्रष्टाचार करणार्‍यांना काँग्रेसमध्ये थारा नसल्याचे काँग्रेसला सिद्ध करायचे असेल. चव्हाणांचा राजीनामा स्वीकारल्या गेल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र अनेकदा गैरव्यवहार, घोटाळे, भ्रष्टाचाराची चौकशी होते, नंतर हातात काय येते? याचा विचार होणे देखील गरजेचे आहे. वारंवार अशा प्रकारची चौकशी व्हावी, दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी, पक्षातून हकालपट्टी, अन्यथा काही दिवस तुरुंगाची हवा खावी लागणे अथवा अन्य दंड आकारणे या गोष्टी आता नेहमीच्या आणि संबंधितांना सवयीच्या झाल्या आहेत.
काहीही करा...काहीही होत नाही! अशी भावना आजकाल अपराध करणार्‍यांच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे दिवसेंदिवस अशा प्रकरणांचा आलेख उंचावत आहे. जनता ओरडते, काही दिवसांनी सगळे विसरुन जाते..असा अनुभव नेहमीच येतो. सापडला तो चोर..असेच असल्यामुळे जो-तो अगदी भ्रष्टाचार का असेनां..जपून पाऊल टाकतो. परंतु मांजराला दूध पिताना कोणी ना कोणी पाहतेच, पाहिले नसले तरीही समजतेच..। प्रकरणात सापडणार्‍यांना कठोर शासन व्हावे, म्हणजे नेमके कसे शासन होण्याची अपेक्षा असते, कोणास ठाऊक।
न्यायव्यवस्थेनेच अशा प्रकारांसाठी नवीन उपाययोजना करणे ही काळाची गरज ठरणार आहे. भ्रष्टाचारात नाव उघड होणार्‍या राजकीय मंडळींना किंवा राजकारण्यास, अधिकारी, पदाधिकारी यांना त्वरीत राजीनामा द्यावा लागणे आवश्यक केले जावे.
याचबरोबर संबंधितांची संपत्ती न्यायालयाच्या अखत्यारित जमा करण्यात यावी, संबंधित प्रकरणांची शहनिशा, चौकशी लवकरात-लवकर पूर्ण व्हावी, दोषी आढळल्यास खरोखर (किमान पाच वर्षे) तुरुंगात रवानगी करण्यात यावी, अशा राजकारण्यास संबंधित पक्षाने पुन्हा कधीही निवडणुकीस उभे होऊ न देणे सर्वच राजकीय पक्षांना न्यायालयाने बंधनकारक करावे, निर्दोष असल्यास, तसे सिद्ध झाल्यास जप्त केलेली रक्कम पुन्हा देऊन एखादे चांगले पद देण्यात यावे आदी उपाययोजना केल्या जाव्यात हीच अपेक्षा

उपमुख्यमंत्र्यांकडून दीपावलीनिमित्त शुभेच्छा

मुंबई, ता. ४- दीपावलीच्या लक्षलक्ष दिव्यांच्या प्रकाशाने आपणा सर्वांचे आयुष्य तेजोमय होवो आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचो. पणतीच्या पवित्र प्रकाशाने अज्ञानाचा अंधःकार दूर होऊन संपन्नतेची दीपमाळ आपल्या आयुष्यात प्रकाशमान होवो..।
पर्यावरणाचे भान राखून ध्वनी आणि वायू प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्यावर नागरिकांनी भर द्यावा या शब्दात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

ओबामा भारत भेट- त्रास आम्हाला कशाला..?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची तीन दिवसांची भारत भेटीची सांगता झाली. ओबामा यांच्या भारत भेटीत प्रामुख्याने त्यांच्या वाहनांचा ताफा सामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरला.
मुंबई येथे विमानतळावर आगमन झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार हॉटेल ताजसह सर्व संबंधित ठिकाणी त्यांचा ताफा पोहोचून ओबामांचे सभास्थळी आगमन होईपर्यंत अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. पन्नास गाड्यांच्या ताफ्यात एक गाडी ओबामा यांची...। त्यांच्या भोवती, मागे, पुढे सुरक्षा रक्षकांचे वलय..ते ज्या गाडीत बसणार ती गाडी सुद्धा अमेरिकेतून आणलेली..। हा ताफा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाताना वाहतुक थांबविलेली..संबंधित ठिकाणचे नेटवर्क थांबवून..स्वतःचे वर्क सुरू ठेवलेले..ठिकठिकाणी जॅमर्स लावलेले..यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास आणि डोकेदुखी सहन करावी लागली. इतकी सुरक्षा व्यवस्था ठेवून वाहतुक थांबविणे म्हणजे देशाचा विकास थांबविण्यासारखे असल्याचे चंदन याने सांगितले. तर, दुसर्‍या व्यक्तीसाठी आपल्याच लोकांचे नेटवर्क, मोबाईल जॅम करणे योग्य नव्हे अशी प्रतिक्रिया सतीश यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या लोकांच्या सुरक्षेवर लाखो रुपये खर्च होतो, याऐवजी थेट हेलिकॉप्टरनेच संबंधित ठिकाणी त्यांना नेल्यास खर्च कमी होऊन दैनिक व्यवहार देखील थांबणार नाहीत अशी प्रतिक्रिया अंजल यांनी व्यक्त केली.

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

भुजबळ यांच्याकडून ओबामा यांना "स्लेव्हरी" पुस्तक भेट

मुंबई, ता. ६ नोव्हेंबवर - उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये लिहिलेले स्लेव्हरी अर्थात गुलामगिरी हे पुस्तक भेट दिले. आपल्यासाठी ही अमूल्य भेट असल्याचे ओबामा यांनी सांगितले.
भारतातील सामाजिक चळवळीचे पहिले क्रांतिकारक महात्मा फुले यांनी १३७ वर्षांपूर्वी हे पुस्तक अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीविरुद्ध लढ्यासाठी योगदान देणार्‍यांना अर्पण केले आहे, हे वाचल्यानंतर ओबामा यांनी , हे पुस्तक आपल्यासाठी अमूल्य भेट असल्याचे सांगितले

मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेवर भुजबळ ठाम

मुंबई, ता. २ नोव्हेंबर- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे ही माझी भूमिका कायम आहे. मात्र, मराठा आरक्षणासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यास पुढाकार घेईन, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे केले. भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक ऍड. माणिकराव शिंदे, नगरसेविका उषा शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पक्षात नव्याने आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला दुय्यम वागणूक दिली जाणार नाही असे सांगून भुजबळ यांनी प्रत्येक घरात पैशाची आवक होईल तेव्हाच खराखुरा विकास होईल असे प्रतिपादन केले.

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

दीपावली शुभेच्छा..

चला उधळू रंग छटांचे, चला उजळू दीप दिव्यांचे,
उर्जेच्या या नव पर्वाचे स्वागत-गीत हे गाऊ या..
दीपावली ही तेजोमयी करण्या लक्ष दीप हो लाऊ या...

कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप

(पनवेल):  राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...