मुख्य सामग्रीवर वगळा

सुट्टीची भटकंती...(७)

आज सकाळी माझी तब्येत जरा बिघडली होती. पोटही बिघडलं होतं थोडं...। असं वाटलं की काल हॉटेलचं खाल्लेलं पचलं नसावं. आज जेवण न करण्याचा विचार करून मी मामीला तसं सांगितलं. मामी म्हणाली, अरे काही नाही..दुपारपर्यंत सगळं ठीक होईल बघं. इकडे ये बरं जरा...। मी मामीने बोलावल्यानंतर मामीच्या मागोमाग माजघरात गेलो. तिथे कपाटावर एक पेटी ठेवली होती..हीच पेटी माझ्यासाठी जादूची पेटी ठरली आणि मी दुपारी आंब्याच्या रसावर ताव मारला...ही पेटी म्हणजेच आपण ऐकून असलेला "आजीबाईचा बटवा" होता.
नेहमी नाही पण केव्हातरी गरज भासत असल्यामुळे पेटीरुपी हा आजीबाईचा बटवा मामीने वर ठेवला होता. मी उंच असल्यामुळे आणि मामासुद्धा शेतावर गेलेला असल्यामुळे मलाच ही पेटी खाली काढायला मामीने सांगितलं. यातलं एक औषध मामीने मला दिलं त्यावर गरम पाणी प्यायलो आणि काय? अकराच्या सुमारास एकदा 'तिकडे' जाऊन फटाक्यांच्या आवाजासह सारं काही मस्त होऊन पोट मोकळं झालं, त्यानंतर थोड्या वेळातच पुन्हा एकदा छान वाटू लागलं. मामीने मला एक चूर्ण दिलं होतं हे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं. नेमकं कोणतं चूर्ण असेल याची उत्कंठा शिगेला पोहोचल्यामुळे मी न रहावून मामीला विचारलं..हे चूर्ण हिंग्वाष्टक चूर्ण होतं. अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतलं होतं. नंतर पोटही थोडं शेकलं. यामुळे जणू काही जादूची कांडीच फिरली होती. डॉक्टरांकडे जाण्याचीही गरज भासली नाही. आपण म्हणतो आयुर्वेदाच्या औषधांमुळे खूप उशीरा बरं वाटतं, पण हा अनुभव मी स्वतः घेतला होता. ऍलोपॅथीचं औषध सुद्धा दोनदा घ्यावच लागतं की...। मग आयुर्वेदाला नावं कशाला ठेवायची? या आजीबाईच्या बटव्यात यासह त्रिफळा चूर्ण, कस्तुरी गोळ्या, त्रिभुवन कीर्ती रस, चंद्रप्रभा वटी, शंखवटी, श्वासकासामृत सिरप, ज्येष्ठमधचूर्ण, सुठ, दालचिनी, थोडी हळद, मिरपूड, जिरपूड, कदली क्षार, जायफळ, वेखंड, पानपिंपळी, वेलदोडा, लवंग, कांदा, दुर्वा अशी कितीतरी सामुग्री होती. यापैकी बर्‍याच गोष्टी तर दररोज स्वयंपाकात वापरल्या जातात.
आज मामाच्या शेतातल्याच आंब्याच्या झाडाच्या कैर्‍यांचं पन्हं आणि गवतात पिकवलेल्या आंब्यांचा रस, पुरी असं पुन्हा एकदा हेवी जेवण होतं. मामीने जेवणात गरम पाणीच प्यायला सांगितलं होतं. मी सुद्धा तसच करून नंतर पुन्हा एकदा मामीने तयार केलेला दुसर्‍या औषधाचा डोस घेतला. गावात यात्रा सुद्धा आली होती. सहज यात्रेत फेरफटका मारायला गेलो. यात्रेत डफडी, भोंगा, बासरी, बॅट सगळ्याच वस्तू होत्या. विविध स्टॉल्स होते. काय काय होतं सांगू? एक विशेष म्हणजे गावात जास्त जाड असे कोणीही नव्हते. स्थूल व्यक्तिमत्व होतं पण आजारी असं कोणीही दिसलं नाही किंवा शहरातल्या माणसांसारखी पोटंही कोणाची हातावर नव्हती. याचं कारण म्हणजे दररोज फिरायला जाणं, शेतावर जाऊन काम करणं हे असावं. शहरात आपण एकाच जागेवर तासन् तास बसलेलो असतो, घरी असताना टीव्ही समोर, आणि ऑफिसमध्ये असताना पीसी समोर...परिणामी अनेक विकार आम्हांला जडले आहेत. ग्रामीण भागात भार नियमनामुळे टीव्ही तर कमीच पहायला मिळतो. शेतात न गेल्यास खाणार काय? असा प्रश्न पडतो...खरंच गावाकडचं वातावरण आणि जीवन किती छान आहे...हे मी अनुभवलं आणि दुसर्‍या दिवशी परत घरी जाण्याचं ठरवलं...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012