पुणे, ता. १८- येथील श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेसोत्सव मंडळातर्फे उद्या (ता. १९) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मंडळातर्फे पुण्यातील नामवंतांना श्री कसबा पुरस्कार देण्यात येणार आहेत. अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल. पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाचे यंदाचे १२० वे वर्ष आहे. यावर्षी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा संगणकतज्ज्ञ, शास्त्रज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक विजय भटकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याचबरोबर पुण्यातील नामवंतांना श्री. भटकर यांच्या हस्ते यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सर्वश्री वैद्य खडीवाली, कॉटनकिंग चे मालक प्रदीप मराठे, सरहद संस्थेचे संजय नहार, सनईवादक प्रमोद गायकवाड आणि गिरीप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक उमेश झिरपे यांना पुरस्कार देण्यात येईल. मंडळाचे माजी अध्यक्ष व नामवंत कायदेतज्ज्ञ अॅड. भाऊसाहेब निरगुडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने निरगुडकर परिवार व कसबा गणपती मंडळातर्फे भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले असून हा पुरस्कार यंदा सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना श्री. भटकर यांच्या हस्ते देण्यात येईल. ...