गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत किशोर कुळकर्णी यांची महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी भेट



जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) - सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक किशोर कुळकर्णी यांनी महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई देवीसिंह पाटील-शेखावत यांची काही दिवसांपूर्वी जळगाव दौर्‍यात भेट घेतली व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपती महोदयांना माहिती दिली. त्यांच्या या स्पृहनिय कार्याबद्दल महामहिम राष्ट्रपतींनी जाणून घेतले व कार्याबाबत समाधान व्यक्त केले. ते जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात कार्यरत आहेत.
       
महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या गत २३ ते २५ मार्च १२ दरम्यान जळगाव दौर्‍यावर आल्या होत्या. किशोर कुळकर्णी यांनी राष्ट्रपती महोदयांना आपल्या कार्याबद्दल माहिती व घडवा सुंदर हस्ताक्षर पुस्तक सस्नेह देण्याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार २४ मार्च रोजी महामहीम राष्ट्रपतींची भेट निश्‍चित झाली. या भेटीत कुळकर्णी यांनी घडवा सुंदर हस्ताक्षर उपक्रमाबाबत माहिती दिली. गत १७ वर्षांपासून ते शालेय विद्यार्थ्यांचे अक्षर सुघड सुंदर व्हावे यासाठी निस्पृहपणे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाचे कार्य करीत आहेत. एकट्या धरणगावमध्ये विविध शाळांच्या सुमारे २००० विद्यार्थ्यांच्या अक्षरांना आपण वळण लावले असून त्या कार्याबद्दल त्यांचा माजी मंत्री अरुणभाई गुजराथी यांच्याहस्ते नागरी सत्कार देखील करण्यात आला होता. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले आहे. यात स्व. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवन येथील शाळेत देखील त्यांनी हा उपक्रम यशस्वी राबविला असून त्याबाबत विकास आणि सौ. भारती आमटे यांनी कुळकर्णी यांच्या कार्याबाबत नोंदविलेला अभिप्राय आणि त्यांनी राबविलेल्या उपक्रमाची विविध प्रसिद्धी माध्यमात प्रकाशित बातम्या, लेख आदी साहित्य देखील राष्ट्रपती महोदयांना या भेटीत दाखविण्यात आले. किशोर कुळकर्णी यांच्या कार्याबाबत महामहिम राष्ट्रपती महोदयांनी समाधान व्यक्त केले. या भेटीत कुळकर्णी यांच्या सुविद्य पत्नी सौ. आरती कुळकर्णी देखील सोबत होत्या.

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिका मतदानासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, ता. १३, - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, चंद्रपूर, परभणी, लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज दिली. येत्या १५ एप्रिलला या महानगरपालिकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे.

श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले, की एकूण ३७१ जागांसाठी २ हजार ४०२ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १ हजार ८५३ मतदान केंद्रांवर एकूण १५ लाख १८ हजार १७३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ८ लाख ४५ हजार ८७८ पुरुष तर ६ लाख ७२ हजार २९५ महिला मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार ४५० मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ९१० अतिरिक्त मतदान यंत्रांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. ४३० संवेदनशील तर ७ अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे आहेत. सर्व सातही संवेदनशील मतदानकेंद्रे परभणी येथील आहेत. सर्वाधिक २२४ मतदानकेंद्रे भिवंडी-निजामपूर येथे आहेत. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मतदारांनी अधिकाधिक संख्येने आणि निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.
महानगरपालिकानिहाय तपशील-
मालेगाव- जागा ८०, उमेदवार ४७१, मतदान केंद्रे ४६७, संवेदनशील मतदान केंद्रे १४४, मतदार संख्या ३, ६७, ३७४.
लातूर- जागा ७०, उमेदवार ४१८, मतदान केंद्रे ३०८, संवेदनशील मतदान केंद्रे ०, मतदार  संख्या २, ५१, २१०.
चंद्रपूर- जागा ६६, उमेदवार ४५८, मतदान केंद्रे २९९, संवेदनशील मतदान केंद्रे २१, मतदार संख्या २, ३६, ९९५.
परभणी- जागा ६५, उमेदवार ४२३, मतदान केंद्रे २६६, संवेदनशील मतदान केंद्रे ४१, मतदार संख्या २, ०३, ४४९.
एकूण- एकूण जागा ३७१, उमेदवार २, ४०२, मतदान केंद्रे १, ८५३, संवेदनशील मतदान केंद्रे ४३०, मतदार संख्या १५, १८, १७३.

रविवार, १८ मार्च, २०१२

युवराज सिंगची हॉस्पिटलमधून सुट्टी...

क्रिकेटपटू युवराज सिंग याची आज बोस्टन (अमेरिका) येथील हॉस्पिटलमधून अखेर सुट्टी करण्यात आली. केमोथेरपी च्या तिसर्‍या आणि शेवटच्या चरणानंतर युवराज याला सुट्टी देण्यात आली आहे. "अखेर तिसरे चरणही संपले, आता आपण मी जाण्यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही, मी मोकळा झालोय...माझ्या सर्व चाहत्यांना आणि अमिष्ट चिंतन करणार्‍यांचे आभार.." या शब्दात युवराजने आपला आनंद देखील व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्यात युवराज याला बोस्टन येथे केमोथेरपी करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. युवराज मैदानावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाऊल ठेऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. केमोथेरपीच्या उपचारांदरम्यान युवराज याचे डोक्यावरचे केस पूर्णपणे गळाले आहेत. सचिनचे शतकांचे शतक अर्थात महाशतक झळकल्यामुळे त्याने सचिन तेंडुलकरचे ट्विटर वर tweet करून अभिनंदन केले आहे.

बच्चन कुटुंबीयांकडे ४ अरब...

लखनौ- वृत्तसंस्था: बॉलीवुड चे बिग-बी आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे ३ अरब ६१ लाख ७ हजार ३११ रुपये, तर त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याकडे ४३ करोड ९ लाख ३० हजार २३ रुपयांची संपत्ती असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. शनिवारी (ता. १७) समाजवादी पार्टीतर्फे जया बच्चन यांनी राज्यसभेसाठी भरलेल्या नामांकनात देण्यात आलेल्या संपत्तीविषयी दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात हा खुलासा करण्यात आला आहे.

या शपथपत्रानुसार, बच्चन दाम्पत्त्याकडे तीन अरब ४३ करोड ७० लाख ३७ हजार ३३४ रुपयांची चल संपत्ती असून १५० करोड रुपयांची अचल संपत्ती आहे.
दागिने- अमिताभ यांच्याजवळ २६ करोड २३ लाख ७ हजार ६८८.    जया बच्चन- १३ करोड ३४ लाख ६२ हजार २९९ रुपयांचे दागिने.
लग्झरी कार- अमिताभ ६ करोड ३२ लाख २६ हजार ५५४ रुपयांच्या लक्झरी कार.
कृषि भूमी- अमिताभ- दौलतपूर (उत्तर प्रदेश) ५० लाख आणि मुजफ्फरपूरमध्ये २९ करोडची कृषि भूमी.
जया बच्चन- काकोरी येथे १.४५ करोड आणि भोपाळ येथे ३.५ करोड रुपयांची भूमि.

(सौजन्य- नईदुनिया)

शुक्रवार, १६ मार्च, २०१२

छगन भुजबळ यांच्याकडून सचिन तेंडुलकरचे अभिनंदन

मुंबई, दि. 16 मार्च : शतकांचे महाशतक ही क्रिकेटच्या विक्रमादित्याकडून माझ्यासारख्या लाखो चाहत्यांना मिळालेली अमूल्य भेट आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी सचिन तेंडुलकरचे अभिनंदन केले आहे.

श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे की, क्रिकेट आणि सचिन तेंडुलकरचे माझ्यासारखे चाहते गेले वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो रोमांचक क्षण आज मिरपूर येथे साकार झाला. सचिनने त्याचे बहुप्रतिक्षित महाशतक आज झळकावले आणि क्रिकेटच्या या विक्रमादित्याने शतकांचे शतक झळकावण्याचा आणखी एक महाविक्रम आपल्या नावावर जमा केला. त्याची ही कामगिरी भारतीय तसेच जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोदविली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत

मुंबई, दिनांक 16 मार्च : केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत सादर केलेल्या सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भागाला दिलासा तसेच कृषि क्षेत्रातील वाढीला चालना मिळणार असून ग्रामीण सडक योजना गतीने मार्गी लागतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री श्री.छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

सन 2012-13 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, देशभरातील 8,800 कि.मी. लांबीचे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करण्याचे या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. त्याचबरोबर, ग्रामीण सडक योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. मुलभूत तसेच पायाभूत सोयीसुविधांच्या या निर्मितीमुळे देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. या अर्थसंकल्पात कृषि, परिवहन तसेच ऊर्जा या क्षेत्रावर भर दिला आहे. त्याचबरोबर कल्याणकारी योजनांची व्याप्तीदेखील वाढविली आहे. शिक्षण घेण्यासाठी झालेली समाजाची जागृती विचारात घेता उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांकरिता या अर्थसंकल्पात वेगळ्या निधीची तरतूद केली असल्यामुळे शैक्षणिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महिला बचत गटाची व्याप्ती आणि कार्य वाढत आहे. या गटांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात चांगली तरतुद केली आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता यासाठी केलेली मोठी तरतूद ग्रामीण भागाचे चित्र पालटण्यास निश्चितपणे हातभार लावील, असा विश्वासही श्री.भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

आचारसंहितेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकांना हरकत नाही

मुंबई, ता. १६ - भिवंडी-निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी व चंद्रपूर महानगरपालिकेची १५ एप्रिल २०१२ रोजी निवडणूक असल्याने या महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहितेमधील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून १४ एप्रिल २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यास हरकत नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आचारसंहितेच्या कालावधीतच असल्याने त्यानिमित्त काढण्यात येणार्‍या मिरवणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा होत आहे. त्याबाबत स्पष्टीकरण करताना श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीत येणार्‍या सार्वजनिक सण-उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा कायम रहावा यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०११ रोजी निर्गमन केलेल्या आदर्श आचारसंहितेमधील परिच्छेद-३ (१७) मध्ये मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. त्यांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यास अथवा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास हरकत नाही. परंतु यासाठी स्थानिक पातळीवर ज्या परवानग्या घ्याव्या लागतात, त्या सक्षम प्राधिकार्‍यांकडून प्राप्त करून घेणे ही संबंधितांची जबाबदारी आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजकीय पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते अशा कार्यक्रमांमध्ये व्यक्तीगतरित्या सहभागी होऊ शकतात. राजकीय व्यक्तीचे नावही कार्यक्रम पत्रिकेवर असू शकते. परंतु संबंधित व्यक्तीच्या राजकीय पक्षाचा अथवा कुठल्या प्रभागातील उमेदवार आहे, याचा उल्लेख नसावा. कार्यक्रम पत्रिकेवर राजकीय नेत्यांची छायाचित्रे नसावी. तसेच अशा कार्यक्रमात राजकीय नेत्यांचे सत्कार आयोजित करू नये. राजकीय नेत्याने किंवा उमेदवाराने कोणत्याही वस्तूचे वाटप करू नये किंवा त्यासाठी अशा कार्यक्रमाचा आधार घेऊ नये. विशेष म्हणजे अशा मिरवणुकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये कुठल्याही पक्षाला प्रचार करता येणार नाही, असेही श्रीमती नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम यादी १० सप्टेंबरला

 सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७...