जे गरिब पर हित करे, ते रहीम बड लोग।
कहाँ सुदामा बापुरो, कृष्ण मिताई जोग।।
अर्थात- जे लोक गरीबांचे भले करतात, ते सर्वात मोठे. मोठे ते नाहीत, जे एखाद्या मोठ्या पदावर असतील...। इथे रहीमदासजींनी कृष्ण आणि सुदामाचे उदाहरण देऊन सांगितलंय की सुदामा गरीब असूनही, कृष्णाने त्याच्याशी मैत्री केली होती..! सुदामा कृष्णाचा 'जिवलग मित्र' होता.
रहीम यांचा हा दोहा अचानक आठवला! निमित्त होतं, ते म्हणजे दारासमोर बसून मधुर आवाजात अभंग सादर करणार्या भिक्षेकर्याचं...! वयाची सत्तरी गाठलेला मात्र तरीही पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही दारोदार फिरून भिक्षा मागणारा हा भिक्षेकरी अनेक दिवसांपासून वेगवेगळे अभंग, भजनं सादर करून मिळेल त्या पैशावर हा गृहस्थ कुटुंबाचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून चालवतोय.
विष्णुबुवा असं यांचं नाव असून काही दिवसांपासून ते इंदूरमधल्या विशेषतः महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरून मराठी बांधवांकडून मिळतील ते पैसे, कपडे आदी वस्तूंद्वारे आपला उदरनिर्वाह चालवतात. महाराष्ट्रीयन कॉलन्यांमध्ये फिरल्यामुळे मराठीत बोलता येतं आणि दोन पैसे जास्त मिळतात अशी विष्णुबुवांची भावना आहे. ते मूळचे महाराष्ट्रातल्या मलकापूरचे असून विदर्भासह मध्य प्रदेशातल्या भोपाळ, जबलपूर, हरदा, इंदूर आदी ठिकाणी जाऊन त्यांच्या मधुर आवाजामुळे नागरीक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन त्यांची वाहवा करतात, मात्र पैसे फार कमी लोक देतात अशी खंत विष्णुबुवा व्यक्त करतात. आपला आधार असलेला एकमेव मुलगा आणि सून काही वर्षांपूर्वीच वारले, यामुळे नातू पांडरुंग याला सोबत घेऊन गावोगावी फिरतो आणि मिळेल त्यात पोट भरतो. मधुनमधुन मध्यप्रदेशातल्या एखाद्या छोट्या गावात शासनातर्फे दोहे, भजनं गाण्याची संधी मिळते तेव्हा मात्र काही-हजार रुपये मिळतात आणि तेवढ्यापुरतं का होईनां, विष्णुबुवांना आनंद होतो. स्व. पं. भीमसेन जोशी यांचे अभंग, भजनं, कबीर, रहीम यांचे दोहे सादर करतात. अक्षरशः काठीचा आधार असलेली एकतारी सुद्धा जुनी झाली असल्याचं तिच्याकडे पाहिल्यावर सहज लक्षात येतं. विष्णुबुवांना सध्या दम्याचा त्रास होत असून गाणं म्हणताना काहीवेळा दम लागतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून मधुर आणि दमदार आवाजात ते भजनं सादर करतात. दम्याचा त्रास होऊ नये म्हणून जवळ बाळगलेला स्प्रे सुद्धा लवकरच संपणार असून, त्यासाठी पैसे कसे जमतील याची चिंता त्यांना सध्या सतावते आहे. तरुणाईला सुद्धा लाजवेल इतका खणखणीत त्यांचा आवाज आहे, हे मात्र खरंय...