अकोला, दि. 2 मार्च: आजवर केवळ काँग्रेसनेच जे बोलले ते करून दाखवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मीलची जागा देण्याचा निर्णय असो वा देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्याचे आश्वासन असो, त्याची पूर्तता फक्त काँग्रेस पक्षानेच करून दाखवली आहे. सर्वसामान्यांसाठी काम करण्याचे हे कर्तव्य काँग्रेस भविष्यातही अशाच प्रकारे पूर्ण करीत राहील, असे मोहन प्रकाशजी यांनी म्हटले आहे.
अकोला येथील स्वराज भवनाच्या प्रांगणात आयोजित अमरावती विभागीय काँग्रेस मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनिस अहमद, अकोल्याचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत आदी नेते याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
या मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री. माणिकराव ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. विरोधी पक्ष केवळ सत्ताप्राप्तीसाठी फोडाफाडीचे राजकारण करीत आहे. देशातील विविध समाज आणि घटकांमध्ये व्देष निर्माण करण्याचे राजकारण त्यांनी चालवले आहे. केवळ काँग्रेस पक्षानेच नेहमी देशाचा आणि सर्वसामान्यांचा विचार केला असून, जनताही सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे, असे आ. माणिकराव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाने अकोला परिसर व अमरावती विभागात केलेल्या विविध कामांची उदाहरणे देत सरकार नेहमी या विभागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अकोला विमानतळाचा प्रश्न आता मार्गी लागला असून, इतर प्रलंबित समस्यांवर विचार सुरू आहे. अमरावती विभाग व अकोला परिसरात गारपीटीने नुकसान झालेल्या शेतक-यांना शासनाकडून मदत देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात सांगितले.
या मेळाव्याला अमरावती विभागातील काँग्रेसचे आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.