पुणे, दि. 16 : ग्रामपंचायतीच्या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार
पाडण्याच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलिस आणि संबंधित
अधिकाऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त नीला
सत्यनारायण यांनी आज येथे दिल्या.
पुणे
जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 63 रिक्त जागांच्या
होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठी 29 मार्च 2013 रोजी मतदान होणार आहे. त्यासंदर्भात
श्रीमती सत्यनारायण यांनी आज येथे आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी विकास देशमुख व
अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आदींसह अन्य संबंधित अधिकारी यावेळी
उपस्थित होते.
मतदान यंत्रे, मार्कर पेन व इतर मतदानाच्या साहित्याबाबत आढावा घेऊन श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी सर्वांनी दक्ष राहावे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक असलेल्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन संबंधितांना निवडणुकांची माहिती द्यावी. तसेच पेडन्यूजबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या नियुक्त केल्या असून त्यासंदर्भातील तक्रारी या समित्यांकडे दाखल कराव्यात.