अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवार दिनांक 1 मार्च 2013 रोजी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि काही निमंत्रितांशी चर्चा केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.
जयपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन पदाधिका-यांशी चर्चा करण्याची घोषणा केली होती. पक्षातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीशी चर्चा केली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.
सकाळी 9 च्या सुमारास राहुल गांधी यांचे मुंबईत आगमन झाले. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्यांनी राहुलजी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी थेट टिळक भवनला दाखल झाले.
त्यांनी सर्वप्रथम दिवंगत नेते स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी प्रतिमेवर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत राहुलजी गांधी यांनी स्व. वसंतदादा पाटील यांनी राजकारण, सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाचा आवर्जून उल्लेख केला, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रवक्ते सचिन सावंत यांनी कळविले आहे.