मुंबई, ता. २ - प्रतापगड किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम अतिशय समाधानकारक असल्याने तातडीने १ कोटी ३१ लाख रुपये उपलब्ध करून दिले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. येथील सह्याद्री अतिथिगृहात किल्ले प्रतापगडच्या जीर्णोद्धारासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यमंत्री सचिन अहिर आदींसह स्थानिक आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की प्रतापगडाच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. प्रतापगड जीर्णोद्धार समिती, पर्यटन विकास निधी आणि लोकसहभागातून हे काम सुरू आहे. जीर्णोद्धाराच्या माध्यमातून पुरातत्व दृष्टिकोनातून हा विकास केला जाणार आहे. त्यात किल्ल्यावरील अवशेषांचे मूळ स्वरूपात जतन करणे, गडाची तटबंदी, दरवाजे, बुरूज यांची दुरुस्ती, मजबुतीकरण, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधा पुरविणे आदींचा समावेश आहे. कामाचा आवाका प्रचंड असल्याने जीर्णोद्धार समितीने प्रतापगड विकासाच्या पहिल्या भागाचा आराखडा चार टप्प्यात तयार करून सादर करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार चार वर्षात १२ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे....