पिंपरी (3 डिसेंबर 2013) : महाराष्ट्र केसरीचा दुसरा मुख्य दावेदार असलेला सोलापूरचा समाधान घोडके याचे आव्हान मुंबई उपनगरच्या सुनिल साळुंके याने एक गुणाने कुस्ती जिंकून संपुष्टात आणले.
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मान्यतेने व महेशदादा स्पोटर्स फाउंडेशनच्या वतीने पै. किसनराव लांडगे यांच्या 71 व्या वाढ दिवसानिमित्त भोसरी येथे कै. पै. मारुती रावजी लांडगे क्रिडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी व 57 वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात हे सामने घेण्यात आले. यावेळी उपमहापौर राजू मिसाळ, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्पर्धा प्रमुख विलास कथुरे, संयोजक व नगरसेवक महेश लांडगे, ऑलिम्पीक मारुती आडकर, सितारामभाऊ भोतमांगे, पिंपरी चिंचवड कुस्तिगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल बराटे, योगेश दोडके, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, मुन्नालाल शेख, रावसाहेब मगर, विजय बनकर, पंच उत्तमराव पाटील, दिनेश गुंड, अंकुश वलकडे, दिलीप पवार, संभाजी वरुटे, बंकट यादव आदींसह हजारो कुस्ती शौकिन उपस्थित होते. या कुस्ती सामन्यांचे सुत्रसंचालन बाबा लिम्हण, शंकर पुजारी यांनी केले.
74 किलो गादी विभागात संतोष गायकवाड (अहमदनगर) आणि रणजित नलावडे (कोल्हापूर जिल्हा) हे सुवर्ण पदकासाठी भिडणार आहे. तर प्रसाद सस्ते (पिंपरी चिंचवड) आणि चंद्रशेखर पाटील (लातूर) हे दोघे कांस्यपदकाचे मानकरी ठरले आहेत.
74 किलो माती विभागात रविंद्र करे (पुणे जिल्हा) याने जयदिप गायकवाड (सातारा) याच्यावर 11 विरुध्द 4 असा 7 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर विश्वभंर खैरे (बीड) याने अण्णा गायकवाड (अहमदनगर) याच्यावर 8 विरुध्द 0 असा 8 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीत फेरी गाठली.
60 किलो माती विभागात दादा सरवदे (सोलापूर शहर) याने देवानंद पवार (लातूर) याचा 5 विरुध्द 3 अशा 2 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. तर अरुण खेंगले (पुणे जिल्हा) याने राहूल यादव (मुंबई उपनगर) याच्यावर 7 विरुध्द 5 अशा 2 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
60 किलो गादी विभागात विशाल माने (कोल्हापूर जिल्हा) आणि सोनबा गोंगाणे (कोल्हापूर शहर) यांची अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी लढत होणार आहे.
96 किलो माती विभागात दुस-या फेरीत मुंबईच्या संतोष सुतारने पिंपरी चिंचवडच्या प्रमोद मांडेकरवर 8 विरुध्द 0 असा 8 गुणांनी विजय मिळवित आपली घौडदौड सुरु ठेवली असे तुळशीदास शिंदे यांनी कळविले आहे.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.