मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मध्य प्रदेशात अजूनही थंडी

महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असला, तरीही मध्यप्रदेशात मात्र अद्याप थंडीचा जोर कायम आहे. दिवसा तापमान २४ ते २५ अंशांपर्यंत जात असून रात्रीचे किमान तापमान मात्र ८ ते ९ अंश असते. गेल्या आठवड्यात थंडी कमी होत आहे अशी चिन्हं असतानाच थंडी मात्र स्थिरावल्याचे चित्र आहे. थंडीमुळे लोकांनी पुन्हा जॅकेट्स, स्वेटर, कानटोपी, मफलर, मुलांना हँडग्लोज् घालणे सुरू केले आहे. शहरातील नागरी वस्त्यांमध्ये रात्री आठनंतर शुकशुकाट दिसतो.

अति सर्वत्र वर्ज्यते...।

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. एका देशातून दुसऱ्या देशात क्षणात ज्या-त्या देशातल्या घडामोडी, घटना यांची प्रत्यक्ष माहिती समजू शकते. वैज्ञानिक विविध विषयांचा अभ्यास करून मानवाच्या हितासाठी, असाध्य रोगांवर तोडगा निघावा म्हणून विविध औषधे,लसींचा शोध लावत आहेत. भारत देखील यात तसूभर देखील मागे नाही. परंतू कोणत्याही बाबतीत मर्यादा ओलांडल्यास पुन्हा शून्यावर वेळ येऊन ठेपते. बंगलोर येथील एका संशोधन केंद्राने टायफॉईड संदर्भात अँटीबायोटिक म्हणून समजल्या जाणाऱ्या हळदीवर अर्थातच हळद या घटकावर संशोधन केले. हळदीचा वापर "अति" केल्यास हळदीच्या अती वापरामुळे माणसावर जीव गमावण्याची वेळ येते असे अनुमान काढल्याचे आजच (30 जानेवारी 11) एका इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे. खरंतर, अति सर्वत्र वर्ज्यते...। हा निसर्ग नियमच आहे, हे या संशोधकांना ठाऊक नसावे. अमृत जरी अति सेवन केले तरीसुद्धा त्याचेही विष तयार होते. हळदीवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी कोणत्याही निष्कर्शावर पोहोचण्यापूर्वी, अनुमान काढण्यापुर्वी ज्येष्ठ, तज्ज्ञ, विशेषतः आयुर्वेदाच्या ज्येष्ठांचा सल्ला, मार्गदर्श

हेलमेट सक्ती किती 'सुरक्षित'...!

काही वर्षांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना हेलमेट लावणे आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्यात आली. प्रारंभी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आणि पाठोपाठ काही प्रमुख शहरांमध्ये आणि नुकतेच मध्यप्रदेशातील इंदूर येथे हेलमेट सक्ती करण्यात आली आहे. हेलमेट सक्ती करणे किती परिणामकारक ठरेल याचा विचार होणे आवश्यक आहे. दुचाकी वाहनचालक, कारचालक अर्थात चारचाकी वाहनचालक वाहन भरधाव चालवितात. विशेषतः शहराबाहेर, शहरातील प्रमुख मार्गांवर, राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन अनेकदा यात वाहनचालकांचे जीव गमावल्याच्या घटना घडतात. दिवसेंदिवस या प्रकारे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघात झाल्यास किमान जीव गमावण्याची वेळ येऊ नये, "सर सलामत तो..." असे म्हणतात नां! याप्रमाणे न्यायालयाने दुचाकी वाहनचालकांसाठी वाहन चालविताना हेलमेट बेल्टसह लावणे अनिवार्य केले आहे. ठिकठिकाणी यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभा, चर्चासत्रांमध्ये प्रतिष्ठितांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील या सक्तीस दुजोरा दिला. हेलमेट न लावणाऱ्या वाहनचालकास दंड आका

औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची स्पर्धा अन्य देशांशी-भुजबळ

मुंबई, ता. २७ - राज्याने सुरवातीपासूनच औद्योगिक क्षेत्रात आघाडी मिळवली असून याबाबतीत राज्याची स्पर्धा देशातील अन्य राज्यांशी नव्हे, तर अन्य देशांशी असल्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले आहे. श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात १९८० मध्ये केवळ ४८६० लघुउद्योग होते. आज अशा सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांची संख्या ३ लाख ५ हजार ६१ इतकी आहे. या क्षेत्रात सुमारे ४३ लाख ६९ हजार २९९ लाख रुपये इतकी प्रचंड गुंतवणूक झाली असून २३ लाख ८ हजार ९४४ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. राज्यात लघु-मध्यम उद्योग अजूनही मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या परिसरातच एकवटलेले दिसतात. अशा उद्योगांच्या विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट वर भर देण्याची नितांत आवश्यकता असून या दृष्टीने ग्लोबल परिषदेत चर्चा होईल असा विश्वास श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला.

केंद्राच्या पर्यटन विकास निधीचा महाराष्ट्राने पुरेपूर लाभ घ्यावा- सुबोधकांत सहाय

मुंबई, ता. २७ - आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकृष्ट करण्याची भारताला मोठी संधी आहे. त्यादृष्टीने केंद्राकडून राज्यांना पर्यटन विकासासाठी निधी दिला जातो. पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या महाराष्ट्राने या निधीचा पुरेपूर लाभ घेण्याची गरज आहे. असे मत केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय यांनी आज येथे व्यक्त केले. कफ परेड येथील  वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. श्री. सहाय म्हणाले की, भारतात कृषि व कृषि आधारित प्रक्रिया उद्योगांना देखील मोठे भविष्य आहे. देशात सुमारे पाच दशलक्ष डॉलर्स किंमतीची फळफळावळ, शेतमाल प्रक्रियेअभावी वाया जातात. आजमितीस आपण त्यापैकी केवळ सहा ते सात टक्के मालावरच प्रक्रिया करू शकतो. या पार्श्वभूमीवर लघु-मध्यम उद्योजकांना प्रक्रिया उद्योगातही गुंतवणुकीची मोठी संधी आहे. गेल्या दोन दशकात भारतीय उद्योगाने मोठी झेप घेतली असून यात लघु-मध्यम उद्योगांचे अमूल्य योगदान आहे. संपूर्ण भारतीय उद्योगाचे प्रतिबिंब या उद्योगांमध्ये दिसते. या क्षेत्रात गुंतवणूक तसेच रोजगार निर्मितीच्याही सर्वाधिक संधी आहेत. असे केंद्रीय उद्योग

भवरलाल जैन यांना "जीवनगौरव"

मुंबई, ता. २७ - जैन इरिगेशन समूहाचे अध्यक्ष व खानदेशचे भूमिपुत्र भवरलाल जैन यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कफ परेड मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये द्वितीय ग्लोबल इकॉनॉमिक समेट-२०११ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय, राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एच. पी. कुमार, न्ययॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर्स असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कोफी बोतेंग, बँक ऑफ इंडियाच्या एक्सपोर्ट विभागाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रंगनाथन आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे चेअरमन कमल मोरारका यांनी स्वागत व ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज चे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी प्रास्ताविक केले.

भेसळ करणार्‍या माफिया टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गतच कारवाईची गरज

मुंबई, ता. २७ - भेसळ करणार्‍या माफिया टोळ्यांवर 'मोक्का' अंतर्गतच कारवाई करण्याची गरज आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे. मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना माफियांनी जाळून मारण्याच्या घटनेबद्दल श्री. भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. पेट्रोल-डीझेल भेसळ करणार्‍या माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सोनवणे यांना माफियांनी जाळून मारल्याचे समजताच श्री. भुजबळ यांनी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नाशिककडे तातडीने प्रयाण केले. भेसळ करणार्‍या माफियांचा प्रश्न खूप जुना असून गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून देखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह आपण अशा टोळ्यांची दहशत रोखण्याची गरज व्यक्त केली होती. या टोळ्या संपविण्यासाठी त्यांच्यावर भेसळ प्रतिबंधक पथकांकडून नव्हे, तर थेट पोलिसांकडूनच कारवाई होण्याची गरज आहे. कायद्याला आव्हान देणार्‍या व कायदा हातात घेणार्‍या या प्रवृत्तींवर 'मोक्का' सारखी कडक कारवाई केलीच पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी त्यांनी केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना शासनातर्फे शुभेच्छा

मुंबई, ता. २६ - देशाच्या ६२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री तसेच संपूर्ण मंत्रीमंडळ, शासकीय प्रतिनिधी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय घटनाकारांना अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता आणि सहिष्णुता या तत्वांचा अंगिकार करण्यासाठी सारे प्रतिबद्ध होऊ या, अशा आशयाच्या आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तळपणार्‍या स्वरभास्कराचा अंत - अजित पवार

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर दीर्घ काळ अभूतपूर्व तेजाने तळपणार्‍या स्वरभास्कराचा अस्त झाला आहे. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. संगीताच्या ध्यासापोटी वयाच्या अकराव्या वर्षापासून भीमसेन जोशी यांनी केलेले कष्ट, प्रयत्न यातून एका अद्भूत गायकीचा जन्म झाला. पंडितजींनी गायलेल्या अभंगरचना, शास्त्रीय संगीतातील त्यांनी आळवलेले विविध राग, चीज, पुण्यात त्यांच्या गुरुंच्या स्मरणार्थ सन १९५३ पासून सातत्याने साजरा होणारा सवाई गंधर्व महोत्सव अजरामर राहतील. पंडित भीमसेन जोशी यांच्या रुपाने एक मौलिक रत्न आज आपण गमावले आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

हळहळलं अवघ्या रसिक जनांचं मन...

माझे माहेर पंढरी, विठ्ठल नामाचा रे टाहो...अशा अनेक भजनांपासून प्रभू अजि गमला..अशी विविध नाट्यगीते, मिले सुर मेरा तुम्हारा...आदी प्रकार सादर करून केवळ रसिकांना थक्क करून सोडणार्‍या आणि जागेवरच खिळवून ठेवणार्‍या पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे अवघं रसिक जनांचं मन हळहळलं आहे. आपल्या मुलाने अभियंता व्हावे असे वडिलांना वाटत असताना, लहानपणापासूनच संगीत क्षेत्राकडे कल असणार्‍या पंडित भीमसेन जोशी यांच्या व वडिलांच्या मतभेदामुळे अत्यंत लहान वयातच भीमसेन जोशी यांनी घर सोडले होते. ग्वाल्हेर येथे किराणा घराण्याचे रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्याकडे त्यांनी दीक्षा घेतली. पंडितजींनी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे १९५२ साली सुरू केला. आजही दरवर्षी पुणे येथे सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नामवंत गायक येथे येऊन हजेरी लावणे हे भाग्य समजतात. कोणत्याही कलाकाराला साजेशा अशा पंडित भीमसेन जोशी यांनी केवळ मराठी रसिकच नाही, तर गैरमराठी रसिकांची मने देखील आपल्या खड्या आवाजामुळे जिंकली होती. मराठी व्यतिरिक्त कानडी आणि