मुंबई, ता. १६ : बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या दहा महानगरपालिकांसाठी आज सुमारे ५४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे. सकाळी साडेसातला मतदानाससुरवात झाली. ठाणे, नागपूर आणि अकोला येथे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. राज्य निवडणूक आयुक्त यांनी स्वतः मतदान केल्यानंतर काही मतदान केंद्राची पाहणी केली. दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी योगदान देणारे सर्व मतदार, अधिकारी, कर्मचारी, पोलिस आणि प्रसार माध्यमांचे श्रीमती सत्यनारायण यांनी आभार मानले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाचे प्रमाण असे- बृहन्मुंबई- ४६, ठाणे- ५२, उल्हासनगर- ४३, नाशिक- ५८, पुणे-५३, पिंपरी-चिंचवड- ५६, सोलापूर-५८, अमरावती- ५८, अकोला- ५७, नागपूर- ५५, एकूण- ५४.