लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेसाठी मतदान होईल. नेहमीप्रमाणे यावेळीही 'नोट' आणि'व्होट' बँक जोरात आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यातील भुसावळ साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-सेना यांच्यातच चुरस असेल हे चित्र तर स्पष्टच आहे. दोन्ही पक्षांनी दिलेले उमेदवार नवीनच आहेत. निवडणुकीत जो उमेदवार विजयी होईल तो होईल. परंतु निवडून आल्यावर आणि विधानसभेत गेल्यावर मतदार संघातील अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे आणि कार्य न विसरता करायवयाची आहेत, हे विसरू नये. पुर्वीच्या ज्येष्ठांचे अनुभव, त्यांचे कार्य यातून शिकून बोध घेऊनच पुढचे पाऊल उचलावे. प्रामुख्याने भुसावळ ते मुंबई पर्यंत एक्सप्रेस, जलद रेल्वे असावी...भुसावळ ते मनमाड अशी आणखी एक रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू करावी ही मागणी प्रलंबित आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस भेडसावते आहेच. हतनूर धरणाची क्षमता वाढविण्याचा विचार व्हावा...सर्व समाजातील घटकांना सहकार्य व्हावे. विरोधकांना देखील सहकार्य करुन विरोध संपवावा. केवळ विरोधासाठी विरोध न करता विधायक कार्ये व्हावीत, हीच अपेक्षा!