तुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा असे मार्गदर्शन श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना केले. स्वच्छता हि मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून आपण सर्वांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे आणि त्यासाठी कंपनी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे कंपनीचे उपव्यवस्थापक एस के भटनागर यांनी सांगितले, या स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानचे साचीनदादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स उपव्यवस्थापक एस के भटनागर,
अविनाश खांदेतोडे, एस के चौधरी, कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व सदस्य सहभागी झाले होते. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे, येत्या १ जुलैस प्रतिष्ठानचे सदस्य राष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.