जळगाव (प्रतिनिधी) - जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व पुणे येथील डीएसके मिल्कोट्रॉनिक्स् प्रयोजित ‘कृषी व डेअरी एक्स्पो 2014’या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे येथील शिवतीर्थ मैदानावर 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अॅग्रोवर्ल्ड हे या प्रदर्शनाचे आयोजक असून प्लँटो कृषीतंत्र व जलश्री सहप्रायोजक आहेत. या चार दिवसीय प्रदर्शनासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जळगाव जिल्हा परिषद, आत्मा व नाबार्ड या शासकीय संस्थांचे सहकार्य लाभले आहे. जळगावात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘डोम स्ट्रक्चर’मध्ये हे प्रदर्शन होत असून 120 स्टॉलधारक सहभागी होत आहेत.
सध्याची दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, हवामानाचा लहरीपणा, दरातील चढ-उतार, शेतमजुरांची टंचाई या बाबींमुळे शेतकरी चिंतीत आहे. याचाच विचार करून गरजेवर आधारीत उपाय सुचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.थोडक्यात प्रात्यक्षिकांवर भर तसेच नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये असेल. मग त्यात अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली, यंत्र, तंत्र, अवजारे, नवीन वाण, फवारणी, खते, काढणी पूर्व व पश्चात तंत्रज्ञान, दरातील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी साठवणूकगृह, रॅपनिंग चेंबर, अत्यल्प खर्चात उपलब्ध असलेले डीहायड्रेशन तंत्र (निर्जलीकरण), दुग्धव्यवसाय सहज व सोपा करण्यासाठी व छोट्या पशूपालकांनाही परवडतील अशी दूध काढणी यंत्र, ‘काऊ कंफर्ट’ तंत्र पहावयास मिळेल. शेततळे,शेडनेट, पॉलिहाऊस, मल्चिंग, गोड्या पाण्यातील मोती संवर्धन यांचे प्रात्यक्षिक तसेच त्यासाठी उपलब्ध शासकीय योजना व बँकांचे अर्थसहाय्य असे सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध असेल, अशी माहीती ‘अॅग्रोवर्ल्ड’च्या शैलेंद्र चव्हाण यांनी दिली. याशिवाय,शेती, माती, पाणी, प्रक्रीया व पूरक उद्योग या विषयातील पुस्तकही प्रदर्शनस्थळी असतील. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राज्यातील अकोला, राहुरी व परभणी हे तीन कृषी विद्यापीठ, सहा कृषी विज्ञान केंद्र, आत्मा,पशूसंवर्धन विभाग, मत्स, रेशीम, पणन, वखार महामंडळ या सर्व शासकीय संस्थांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात विविध शासकीय योजनांची माहीती तसेच त्याबाबतचे प्रात्यक्षिक पहावयास मिळेल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी किसनराव मुळे यांनी स्पष्ट केले.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.