मुंबई दि. 29 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला आहे.
या कार्यक्रमानुसार सदर निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी गुरुवार दि. 4 डिसेंबर 2014 ते सोमवार दि. 8 डिसेंबर 2014 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून रविवार दि. 7 डिसेंबर 2014 हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने फक्त ऑनलाईन नामनिर्देशनपत्रे भरता येतील. मंगळवार दि. 9 डिसेंबर 2014 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 11 डिसेंबर 2014 हा असून मंगळवार दि. 23 डिसेंबर 2014 रोजी मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर किंवा संध्याकाळी 6 वाजता करण्यात येईल. बुधवार दि. 24 डिसेंबर 2014 रोजी या निवडणुकांचे निकाल प्रसिध्द करण्यात येतील.
नांदेड आणि गडचिरोली या जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम वरीलप्रमाणेच असून या दोन जिल्ह्यातील निवडणुकांची मतमोजणी बुधवार दि. 24 डिसेंबर 2014 रोजी होणार असून त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल प्रसिध्द करण्यात येतील. फक्त गडचिरोली जिल्ह्यातील मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहणार असून अन्य सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
सार्वत्रिक निवडणूक असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात तसेच पोटनिवडणुका असलेल्या ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रात आज रात्री 12.00 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होईल व निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील असे राज्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.