मुख्य सामग्रीवर वगळा

कॉम्प्यूटर होतोय हुश्शार...

कॉम्प्यूटर, संगणक म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात माहिती विश्लेषित करणारे, माहिती देणारे, सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण असे आपण म्हणू शकतो. स्मृती म्हणजेच स्मरणशक्ती, तसेच तर्क म्हणजे कल्पनाशक्ती...या दोन शक्ती ज्या व्यक्तीच्या अंगी अचाट असतील अशी व्यक्ती अत्यंत चुणुकदार, हुशार मानली जाते. हत्ती या प्राण्याची स्मरणशक्ती देखील अचाट असते असे म्हणतात. बहुदा मानव आणि हत्ती यांच्या कल्पना आणि स्मृती या दोन गोष्टी ध्यानात घेऊनच संगणकाचा शोध लागला असावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. कॉम्प्यूटरमुळे मानव जरी जगाच्या पलिकडे आणि अलिकडे पोहोचला असला तरीही अद्याप कॉम्प्यूटर हुशार होतोय.
मानवाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि माहितीचे अदान-प्रदान करण्यासाठी विशिष्ट माध्यमाची आवश्यकता असते, त्यासाठी भाषा हे उत्कृष्ट साधन असते. परिणामी आज जगात अनेक भाषा असून कॉम्प्यूटरचे सुद्धा हेच आहे, कॉम्प्यूटरच्या सुद्धा सी, जावा यासारख्या अनेक भाषा आहेत. कॉम्प्यूटर बनवणाराही माणूसच आहे नां, यामुळे माणसाने जी भाषा, ज्या भाषा त्याच्या निर्मितीच्या वेळी फीड केल्या असतील (कॉम्प्यूटरच्या डोक्यात भरवल्या असतील) त्याच त्याला समजणार. उर्वरित पाटी कोरीच की...। साध्या भाषेत सांगायचं झाल्यास बाळाला/मुलांना लहानपणीच जी भाषा ज्या भाषा शिकवल्या जातील त्याच त्यांच्या मेंदूत(हार्ड डीस्क) फीड होतात. तसच आहे इथेही। मात्र मानव जसा भावनाप्रधान आहे, तसे कॉम्प्यूटरच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही, हे कॉम्प्यूटरद्वारे चालणार्‍या रोबोट मुळे लक्षात येते.
भारतात कॉम्प्यूटर बराच उशीरा आला असला तरीही जग जवळ येण्यास, या क्षेत्रात विलक्षण प्रगती होण्यास या देशातल्या हुशार नागरिकांमुळेच साध्य झाले आहे. शेवटी काय, इथे बिचार्‍यांना छान पैसे, पगार मिळत नाही नां. ही बाब पाश्चिमात्यांनी लक्षात घेतली आणि देशातल्या हिर्‍यांना त्यांच्या देशात आमंत्रण देऊन पैलू पाडले आणि त्याचा प्रकाश अख्ख्या जगाला मिळाला. एकेकाळी धूळपाटी असणार्‍या, बोरू ने लिहिले जाणार्‍या, अक्षरासाठी सुलेखन वही शाळेत सक्तीची करावी लागणार्‍या देशात आता कॉम्प्यूटरने क्रांती मात्र झाली आहे. कॉम्प्यूटरमुळे अक्षर खराब असले तरीही काहीच घाबरायचे नाही, विविध प्रकारचे सुंदर अक्षर असलेल्या विविध लीपी अस्तित्वात आल्या आहेत. सध्या तर इंटरनेटमुळे जग काय माणूसही एकमेकांच्या जवळ आलाय. कॉम्प्यूटरमुळे माणूस एकमेकांपासून दूर जातोय, तोडला जातोय, हे जितकं खरं वाटतयं, तितकच हे सुद्धा खरं आहे, की तो जवळ आलाय. उदाहरण द्यायचं झाल्यास, आपले नातेवाईक अमेरिकेत असल्यास क्षणार्धात त्यांना मेलद्वारे पत्र पाठविले जाते. वेब-कॅम च्या शोधामुळे क्षणात ते आपल्या समोर दिसू शकतात. एकाच नाण्याच्या दोन बाजुंप्रमाणे हे आहे. कॉम्प्यूटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन महत्वाचे हिस्से आहेत. माणसाच्या हृदय आणि मनाप्रमाणेच यांचे कार्य चालते. प्रश्न राहिला मज्जासंस्थेचा तो सुद्धा मदर-बोर्ड, मेमरीद्वारे सोडविला गेला आहे. एखाद्या विषयाबद्दल, व्यक्तीबद्दल माणसाचे मन काही वेळा लगेच बदलते (हृदयपरीवर्तन) किंवा काही वेळा वेळ लागतो. तसेच कॉम्प्यूटरचे आहे. अनेक जणांनी अनेकदा एखाद्याविषयी वेगवेगळी माहिती सांगितल्यानंतर जशी अवस्था मनाची होते, जसा गोंधळ उडतो, तसाच गोंधळ कॉम्प्यूटरचाही उडतो आणि तो तसा संदेश देतो. हे त्याला कोणी भरवले? उत्तर सोपे आहे, माणसानेच...। एखादी व्यक्ती अती हुशार असते, तिची स्मरणशक्ती अचाट असते, तसेच महासंगणकाच्या बाबतीत (सुपर कॉम्प्यूटर) म्हणता येईल. एक कॉम्प्यूटर अनेक कर्मचार्‍यांचे काम करू शकतो आणि परिणामी तितक्या संख्येने लोक बेरोजगार होतात हे खरं आहे, पण प्रगती, विकास साधायचा असेल तर प्रवाहाबरोबर गेलेच पाहिजे असे म्हणतात. बेरोजगारांना शासनाने आधी काहीतरी उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य आणि पैसा देणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस येणारी प्रत्येक पीढी जुन्या पीढीपेक्षा हुशार असल्याचे जाणवत आहे, तसेच कॉम्प्यूटरचेही आहे. याचबरोबर थोडी मनोरंजनाची बाब म्हणजे पुर्वी माणसाची उंची जशी भरपूर होती, आकार मोठा होता (थोडक्यात देहयष्टी धिप्पाड) पण त्या तुलनेत आता लोक त्यापेक्षा कमी उंचीचे (खुजे) कॉम्पॅक्ट...। तसेच दिवसेंदिवस कॉम्प्यूटरचा आकारही अगदी कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लॅपटॉप, फ्लॅट स्क्रीन, टीएफटी असे कॉम्प्यूटर छान वाटतात, पण अशी उंची माणसाची नसावी, हे देखील चुकीचे नाही. "आलेया देवाजीच्या मना, तेथे कोणाचेही चालेना" एवढे सांगून उंचीचा विषय इथेच सोडतो...असो.
सध्या मुलांना अगदी पहिल्या इयत्तेपासूनच कॉम्प्यूटरचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. मध्यंतरी काय, आजही अनेक मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीची दुखणी सुरू झाली आहेत. यावर उपाय म्हणून काही शाळांनी संपूर्ण शिक्षण कॉम्प्यूटरवरच देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दप्तराविना शाळा...असे आपण म्हणू. काही वर्षात तर सध्या सुरू असलेले पीएच.डी. किंवा संगणक क्षेत्रातले विविध कोर्सेस बंद होऊन दहावी कॉम्प्यूटर झालेला विद्यार्थी अत्यंत हुशार असेल. इंग्रजांच्या काळात जसे दहावी शिकलेला विद्यार्थी हुशार, त्याला नोकरी लगेच तयार... तसेच होईल असे वाटते. आणि हे देखील खरंच वाटतयं. फोटोशॉप सारखे विषय अनेक लहान मुलंही छान हाताळतात. म्हणजे आजच रोजगाराचे साधन त्यांना उपलब्ध असून सुटीमध्ये, लग्नसराईमध्ये ते याद्वारे अर्थार्जन करुन पालकांना हातभार लाऊ शकतात, किंवा स्वयंरोजगारित होऊ शकतात. कशाला हवे मग, पदवी आणि पदविका?
इंटरनेट
'इंटरनेट' हा विषय अतिशय गहन आहे. गुंतागुंतीचा...असं म्हटल्यास वावगं ठरू नये, कारण वेब-नेटवर्क...म्हणजे वेबचे प्रचंड जाळे, गुंतागुंत। सातत्याने वाढणार्‍या सायबर क्राईम अर्थात इंटरनेट गुन्हेगारी.. मुळे इंटरनेट चांगलच गाजतयं. याला पालकही थोडे जबाबदार आहेतच. पण त्याचा इथे काहीच संबंध नाही, संदर्भ मात्र आपल्याला सहज लक्षात येण्यासाठी दिलायं. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक युवकांना/ चॅटिंग(गप्पा) करण्याचा नादच लागलायं, छंदापेक्षा नाद हा शब्दच जास्त योग्य वाटतो. कारण या नादात ते प्रचंड पैसा गमावतात, फसवणुकीचे प्रकार होतात. पण लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनेकांचे 'इंग्रजी' या चॅटिंग, गप्पांमुळे पक्के झाले आहे. "हॅकिंग" नंतर पुन्हा ताळ्यावर येण्यासाठी काय करावे? हे जरी कॉम्प्यूटरच सांगत असला तरीही अजूनही कॉम्प्यूरला स्वतःला अनेकदा निर्णय घेता येत नाहीत. आपण एखादा शब्द कॉम्प्यूटरवर लिहिल्यास तो तसा शब्द नसला तर त्यासारखे शब्द आपल्याला दाखवतो. उदा. ( set as wallpaper anyway. हे वाक्य आपण शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याकडे तसे नसेल तर तो set as (कोणताही शब्द) anyway.) असे विचारतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणजेच, होतोय की नाही अजून संगणक संपूर्ण-हुशार....। (कॉम्प्यूटरविषयी हे मत वैयक्तीक आहे, ते चूक असू शकते कारण लेखक कॉम्प्यूटर तज्ज्ञ नाही).

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.