ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी हाती भरलेली लेखी नामनिर्देशनपत्रेही स्वीकारण्यात येणार
मुंबई दि. 6 – जानेवारी ते एप्रिल 2015 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधेतील त्रुटीमुळे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरु शकत नसेल अशा ठिकाणी तो हाती भरलेले लेखी नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करु शकेल असे राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेल्या प्रसिध्दिपत्रकात पुढे म्हटले आहे की जे इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अंतिम वेळेआधी म्हणजे सोमवार दि.8 डिसेंबर, 2014 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष हजर असतील अशा उमेदवारांचे लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारु शकतील. तथापि, अशा सर्व लेखी अर्जांची संगणकीकृत माहिती भरण्याची जबाबदारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची असेल.