एकनाथ ठाकूर यांच्या निधनाने बँकिंग व्यवसायाचा मानवी चेहरा हरपला --उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली
मुंबई, दि.7 :- सारस्वत बँकेचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. देशातील बँकिंग व्यवसायाला मानवी चेहरा देणारं, सामाजिक बांधिलकी जपणारं दिलखुलास व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हापणसारख्या दुर्गम खेड्यात जन्म झालेल्या ठाकूर साहेबांनी गरिबीशी सामना करत स्टेट बँकेसारख्या अग्रगण्य बँकेत नोकरी मिळविली. बँकिंग व्यवसायाशी आलेला हा पहिला संबंध त्यांच्या अखेरपर्यंत कायम राहिला. महाराष्ट्रातल्या तरुणांना बँकिंग व्यवसायाची दारं खुली करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांनी स्थापन केलेल्या नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगने लाखो तरुणांना बँकिंग व्यवसायात नोकरी मिळवून दिली. नाशिकचं कुसुमाग्रज प्रतिष्ठान, कोकण मराठी साहित्य परिषदेसारख्या विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचं योगदान मोलाचं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बँकेने केलेली प्रगती इतर बँकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे.
गेली तब्बल 42 वर्षे कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचं दर्शन घडवलं. त्यांचं संपूर्ण जीवन महाराष्ट्रीय युवकांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या बँकिंग आणि सामाजिक क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.