मुंबई - (प्रतिनिधी) - सायन ते कळंबोली हा दहा पदरी रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या रस्त्याचा ९५ टक्के भाग सिडकोच्या कार्यक्षेत्रात येतो. सिडकोच्या उभारणीत येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या रस्त्यावरील टोलचा भार नवी मुंबईकरांवर पडू नये, यासाठी आपण आजच्या कॅबिनेट बैठकीत सिडकोतर्फे १२०० कोटी देण्याची मागणी करणार असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विष्णूदास भावे नाट्यगृह,वाशी येथे पार पडलेल्या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
ठाणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोलनाके आहेत. हे टोलनाके कसे कमी करता येतील, यावरही विचारविमर्श चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. MMRDA, सिडको आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यांचा समन्वय साधून हे टोलनाके बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच Light Motor Vehicle ला दुचाकी, तीन चाकी आणि एसटीप्रमाणे टोलमधून वगळता येऊ शकते का? याचीही चाचपणी चालू केल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले.
मुंबई दि.01 :- राज्यात धुळे ,नंदुरबार व अकोला या तीन जिल्हापरिषदाआणि त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांसाठी एकूण अंदाजे सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडली अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने दि.६ नोंव्हेबर २०१३रोजी धुळे ,नंदुरबार व अकोला या जिल्हापरिषदा व त्या अंतर्गत असलेल्या १७ पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार मतदान घेण्यात आले. धुळे जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी५५टक्के, अकोला जिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ५५ टक्के तसेच नंदूरबारजिल्हापरिषद व पंचायत समित्यांसाठी ६० टक्के मतदान झाले. वरील सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून उद्या दिनांक ०२ डिसेंबर, 2013 रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल अशीही माहिती श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे.