आज (२२ एप्रिल) वसुंधरा दिवस साजरा केला जातोय. दरवर्षीच हा दिवस साजरा केला जातो, आनंद वाटतो, परंतु संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब अर्थातच वसुधैव कुटुंबकम् ही संकल्पना, हे स्वप्न कधी साकार होणार ? खरंतर हे कोडंच आहे. इतकं मात्र म्हणता येईल, की अनेक पाकळ्या असलेल्या या फुलाची एक-एक पाकळी आता उलगडू लागल आहे. अनेक बडी राष्ट्र पृथ्वीचं रहस्य उलगडण्याच्या मागे सध्या लागली आहेत. यासाठी महाकाय अशी यंत्रणा सुद्धा राबवली जातेय. सुरवातीलाच यात दोष निर्माण झाला, तरीही हिंमत न हारता पुन्हा नव्याने सुरवात करून नव्या जोमाने मोहिम-शोध-कार्य सुरूच आहे. दुसरा भाग सांगायचा झाल्यास पृथ्वी एक आहे, पण इथे अनेक जाती-धर्म, भेद-भाव, राज-कारणं आहेत. अनेक देशांमध्ये हिंसा सुरूच आहे, निष्पाप मरताहेत, हिंसा करणारे मात्र हातावर तुरी ठेवून पसार होण्यात यशस्वी होत आहेत. हे सगळं का होतयं, केवळ सत्तेसाठीच नां? देशप्रेम राहिलं कुठे आता? असे अनेक प्रश्न निकाली काढण्याऐवजी माणसांऐवजी त्यांनाच जीवंत ठेवण्यात अनेक ठिकाणच्या सरकारांना स्वारस्य आहे. विविध देशांमध्ये बराच मोठा भाग नक्सलवादी, अतिरेकी, विघातक ताकदींच्या हातात आहे. याला जबाबदार कोणाला ठरवावे? हे सर्व का चालले आहे? केवळ पोटासाठी-खिशासाठीच नां? पण इतर निष्पापांनाही मनं आहेत, त्यांचेही कुटुंब आहे, त्यांची वाट पाहणारे घरी कोणीतरी आहेत, त्यांची तरी कदर व्हावी. बिचारी पृथ्वी...दररोज किती घटना पहाव्या लागताहेत तिला...सचेत असूनही अचेत व्हावे लागते आहे तिला, ते सुद्धा नाईलाजाने...एक दिवस नक्की येईल, तेव्हा माझी सर्व बाळं एकत्र येऊन जाती-भेद विसरून फक्त अखील मानव-माणूस म्हणूनच जीवन व्यतीत करेल आणि मी सुखी होईन...असं तिला नक्कीच वाटत असणार। "सर्वे भवंतु सुखिनः संतू निरामय"...असं माणसाचं निरामय जीवन पाहण्यासाठी सृष्टी आणि पृथ्वी रचयित्याचे डोळेही आसुसलेले असणारच...।
महाबलि
महाबलि