शिर्डी ता. १८ - राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. कारखान्याने ६१ गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, मुळा प्रवरा इले. को. ऑप. सोसायटी लि. श्रीरामपूरचे चेअरमन अण्णासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते. या कारखान्याचा आदर्श राज्यातील अन्य कारखाने घेत असल्याची प्रशंसा श्री. भुजबळ यांनी करून नगर-मनमाड रस्त्यासह राज्यातील इतर रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील असे सांगितले. यावेळी अध्यक्ष श्री विखे पाटील यांनी कारखान्याच्या कार्याचा आढावा घेतला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर उत्पादनास सुरवात होणार असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर, यंदाच्या दिवाळीसाठी कामगारांना १८ टक्के बोनस जाहीर केला.