एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, ५ एप्रिल, २०११

भुजबळांनी गोव्यात पाहिली जीवरक्षक दलाची प्रात्यक्षिके!

म्हापसा, गोवा, दि. 4 एप्रिल : महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांवर (बीचेस) जीवरक्षक सेवा सुरू करण्याचा आमचा मानस असून त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या समता मेळाव्याच्या निमित्ताने गोव्यात आलेल्या श्री. भुजबळ यांनी आज सकाळी येथील सिंकेरी बीचवर कार्यरत असलेल्या 'दृष्टी लाइफगाड्र्स'तर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाची, त्यांच्या यंत्रणेची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, बीचवर आनंदासाठी येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्यास जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर गोव्यामधील विविध बीचेसवर लाईफगाड्र्सच्या माध्यमातून पर्यटकांची सुरक्षितता उत्तमरित्या जपली जात आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करण्याचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने आज या सिंकेरी बीचवरील लाईफगाड्र्सच्या कामकाजाची माहिती घेतली असता यंदाच्या मोसमात एकाही व्यक्तीचा बळी याठिकाणी गेलेला नाही, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. लाईफगाड्र्सच्या जलद प्रतिसादामुळे येथे शेकडो लोकांचे जीव वाचले. त्याचप्रमाणे स्थानिकांना प्राधान्याने उत्तम प्रशिक्षण देऊन लाइफगार्ड म्हणून रोजगार संधीही उपलब्ध होऊ शकते, ही बाबही अधोरेखित झाली, असेही भुजबळ म्हणाले.
यावेळी दृष्टी लाईफगाड्र्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वीरेंद्र कंवर आणि उपाध्यक्ष राजेश गर्ग यांनी श्री. भुजबळ यांना येथील अत्याधुनिक नियंत्रण कक्षाची सविस्तर माहिती दिली. जीवरक्षक दलातील सर्व सदस्य वॉकी-टॉकीद्वारे सातत्याने एकमेकांच्या संपर्कात असतात. व्यक्तीगत पातळीवर प्रत्येकजण बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्यासाठी सक्षम असून त्याला तातडीच्या मदतीसाठी जेट-स्की, हाय स्पीड क्राफ्ट अशा बोटी तैनात असतात. त्याचप्रमाणे जीवरक्षक दलाच्या जीपही तातडीच्या मदतीसाठी किनाऱ्यावर उपलब्ध असतात, अशी माहिती त्यांनी श्री. भुजबळ यांना दिली. एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला कशा प्रकारे वाचवता येऊ शकते, याचे प्रात्यक्षिकही भुजबळ यांना दाखविण्यात आले. त्यानंतर जीवरक्षक दलाकडे असणाऱ्या अत्याधुनिक साधनसामुग्रीची, जीवरक्षक दलातील सदस्यांसाठी कंपनीने उपलब्ध केलेली सुसज्ज व्यायामशाळा आणि त्यांच्या निवासव्यवस्थेचीही भुजबळ यांनी पाहणी केली.