मुख्य सामग्रीवर वगळा

रात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा: अजित पवार


मुंबई, ता. १ - शेतकर्‍यांना शेतीसाठी रात्री दहा तास अखंडितपणे वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पासंबंधातील विरोधकांच्या शंकांचे निरसन करताना अर्थसंकल्पीय भाषणाच्या दरम्यान व्यत्यय आणणार्‍या विरोधी पक्षाच्या सदस्यांचा खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले, की शेतकर्‍यांच्या प्रतिनिधीच्या हातात अर्थ आणि उर्जा खाते असल्यामुळे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या भल्याचे निर्णय घेत आहे. आघाडी सरकार शेतकर्‍यांचे हित बघणारे आहे. शेतकर्‍यांना काळ्या आईची इमान-इतबारे सेवा करता यावी याकरिता त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याज दर, तर ५० हजार ते ३ लाख रुपयांपर् यंत फक्त २ टक्के व्याज दर आकारण्यात आला आहे. राज्यातील भारनियमन संपून वीजेचा अखंडित पुरवठा होण्यासाठी जैतापुर सारख्या वीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी करताना त्यामध्ये राजकारण आणणे गैर आहे.

राज्याने ओव्हरड्राफ्ट घेतला आहे, या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आरोपाचे खंडन करताना ते म्हणाले की, आघाडी शासनाने २००५ सालानंतर एकदाही ओव्हरड्राफ्ट घेतला नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती युतीच्या काळापेक्षा चांगली आहे. राज्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये लोकप्रिय घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात दिलेला शब्द मार्च २०१२ पर्यंत पूर्ण करता आला पाहिजे ही त्यापाठीमागची भूमिका आहे. राज्याने मागील वर्षाची महसूली तूट भरून काढल्यामुळेच यावर्षी शिलकीचे अंदाजपत्रक सादर करू शकलो आहे. राज्याच्या आर्थिक विकासाचा गाडा योग्य दिशेने हाकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील विकासाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. यासाठी मागासलेल्या तालुका आणि जिल्ह्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे. वार्षिक जिल्हा आराखड्याला वाढीव निधी देण्यात आला आहे. आमदारांचा विकास निधी देखील दीड कोटी रुपयांवरून दोन कोटी रुपये करण्यात आला आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012