एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, ४ मार्च, २०११

डाव्यांनी फुलेंचा शेतर्‍यांचा आसूड स्वीकारला नाही: विचारवंत वानखेडेमुंबई, ता. ४ (प्रतिनिधी) - महात्मा गांधी असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्याच विचारात जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असे आपण मानत नाही..कुण्या एकाच्या विचारात अशी सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात. महात्मा फुलेंना केवळ सामाजिक अंगाने डाव्यांनी स्वीकारले, मात्र शेतकर्‍यांच्या आसूड या अर्थाने त्यांना डाव्यांनी स्वीकारले नाही..शेतकरी आत्महत्येच्या गेल्या काही वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला असता हे लक्षात येते की पोळा जवळ आला की शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ होते..विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि पत्रकार चंद्रकांत वानखेडे बोलत असतात आणि सभागृहात उपस्थित श्रोते आणि मान्यवर दंग होऊन ऐकतात व नकळत आत्मपरिक्षणही करू लागतात...!
हे चित्र प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये 'आपला चि वाद आपणांशी' या आत्मकथनाच्या दुसर्‍या आवृत्तीच्या पुनर्प्रकाशन समारंभात पहायला मिळाले. या समारंभात डॉ. रवी बापट, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, मी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक सचिन परब यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. यानंतर रंगलेल्या प्रकट मुलाखतीत प्रतिमा जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना वानखेडे यांनी आपल्या जीवनसंघर्षातील अनुभवाचे बोल ऐकवले. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत वानखेडे यांच्या अभ्यासाला खुद्द पी. साईनाथ यांनी सलाम केला आहे. वानखेडे यांनी एस. एम. जोशी यांचे सहाय्यक म्हणूनही काही वर्षे काम केले आहे. "पोळा हा सण साजरा करताना शेतकरी आपल्या शेतावर काम करणार्‍या गड्याला पुरणपोळीचे जेवण खाऊ घालतो. आणि पोळ्याच्या आदल्या रात्री वर्षभर राबणार्‍या बैलाची खांदशेकणी करतो. खांदशेकणी बैलाच्या खांद्याला लोण्याने चोळले जाते. मात्र कर्जबाजारी झालेला शेतकरी आपण बैलाची खांदशेकणी वा गड्याला पुरणपोळीही खाऊ घालू शकत नाही, या दुःखानेच शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या ही संपलेल्या आंदोलनातून उत्पन्न झालेली 'सायलेंट मूव्हमेंट' " . या शब्दात त्यांनी भारत आणि इंडियातील विषमतेची दरी किती खोल आ हे हे दाखवून दिले.
या मुलाखतीत वानखेडे यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या माया यांनीही मेटीखेडा या आपल्या गावात ग्रामपंचायतीत सर्व महिला निवडून आणण्याच्या प्रयोगाची माहिती दिली.
उत्तम साहित्यकृती - डॉ. बापट
आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि साहित्यिक डॉ. रवी बापट यांनी आपल्याला हे पुस्तक खूप आवडल्याचे सांगतानाच वानखेडे यांनी अनेक मान्यवरांचे बुरखे टराटरा फाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. समाजात मोठे म्हणून मिरवणारे लोक हे ढोंगी आहेत. त्यांचे खरे रूप उघडकीस आणल्याशिवाय जनता जागरूक होणार नाही. असे म्हणत त्यांनीही नाव न घेता काही सामाजिक कार्यकर्त्यांचे वस्त्रहरण केले. "मार्क्सवादी भ्रष्ट झाला तर क्रूर होतो आणि गांधीवादी भ्रष्ट झाला की ढोंगी होतो" हे वानखेडे यांचे वाक्य सुभाषितच असल्याचे ते म्हणाले