मुख्य सामग्रीवर वगळा

उत्तर महाराष्ट्राच्या हवाई क्षेत्रातील विकासाचा नवा अध्याय सुरू: भुजबळ

ओझर येथील विमानतळाच्या विकासा संदर्भात महाराष्ट्र शासन आणि एच. ए. एल. यांच्यात, मंत्री छगन भुजबळ आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी हस्तांदोलन करताना सचिव नंदकुमार जंत्रे आणि पी. वी. देशमुख
मुंबई, ता. ३ - नाशिक येथील ओझर विमानतळावर प्रवासी सुविधांच्या विस्तार आणि विकासामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
ओझर विमानतळावरून नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्नशील असलेल्या श्री. भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात ओझर विमानतळाच्या आधुनिकीकरणासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड उपस्थित होते. सामंजस्य कराराबद्दल अत्यंत समाधानाची भावना व्यक्त करून श्री. भुजबळ म्हणाले की, सध्या ओझर विमानतळावर केवळ एचएएल च्या संरक्षण खात्याचा टर्मिनल कॉम्प्लेक्स आहे. आता सर्व सुविधांनी युक्त अशा पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असल्याने तिथून व्यापारी तत्वावरील खाजगी नागरी हवाई वाहतूक सुरू करण्यात अडचण येणार नाही. नांदेड, औरंगाबाद, जालना येथील विमानतळांच्या धर्तीवरच हा टर्मिनल विकसित करण्यात येईल. प्रवासी वाहतुकीबरोबरच स्थानिक कृषी उत्पादनांची निर्यात, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच विभागाच्या एकूणच औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळेल.
सचिव श्री. जंत्रे यांनी सांगितले की, सुमारे ४० कोटी रुपये खर्चाच्या या पॅसेंजर टर्मिनल कॉम्प्लेक्सच्या प्रकल्पामध्ये व्हिव्हीआयपी लाऊंज, पॅसेंजर लाऊंज याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. सध्या मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीस पर्यायी विमानतळ म्हणून अहमदाबाद विमानतळाचा वापर करण्यात येतो. तथापि, ओझर येथील विमानतळ विकसित झाल्यानंतर भविष्यात मुंबई विमानतळाला तो एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.
एचएएल चे व्यवस्थापकीय संचालक पी. व्ही. देशमुख म्हणाले की हा प्रकल्प आता 'ड्रीम प्रोजेक्ट' असून आजचा करार ४० कोटींचा असला तरीही यापूर्वीच हिंदुस्थान एरोनॉटिक्सने येथे कित्येक कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक सोयीसुविधा विकसित केल्या आहेत. मुंबई विमानतळासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आम्ही विकसित करीत आहोत. सुमारे २० कोटी रुपये खर्चून सात ते आठ विमानांचा पार्किंग लॉट नुकताच तयार केला आहे. ओझऱची दहा हजार फूट लांबीची धावपट्टी तेरा हजार फुटांची करण्याचा आमचा मानस आहे. जेणे करून एअरबस चे जंबो-जेटही येथे उतरू शकेल. देशात मुंबई विमानतळाची धावपट्टी केवळ दहा हजार फुटांची आहे, ही गोष्ट लक्षात घेतल्यास या विमानतळाचे महत्व लक्षात येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012