एकूण पृष्ठदृश्ये

मंगळवार, १ मार्च, २०११

छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे छगन भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी अनावरण

मुंबई, ता. १ - अखिल महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मेण-पुतळ्याचे उद्या (ता. २ मार्च) सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. मरिन ड्राइव्ह येथील इक्सिया इव्हेंट लाउंजमध्ये सायंकाळी चारला अनावरण समारंभ होईल.
छत्रपती शिवरायांचे जगभरात अनेक पुतळे असले तरी मेणापासून बनविण्यात आलेला हा शिवरायांचा जगातील पहिलाच पुतळा आहे. भारतातील एकमेव वॅक्स आर्टिस्ट असलेलेल तसेच लोणावळा येथील "सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम" चे संकल्पक-कलाकार सुनिल कंदल्लूर यांनी हा पुतळा तयार केला आहे. आजपर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक व्यक्तींचे मेणाचे पुतळे तयार केले आहेत. शिवाजी महाराजाचा पुतळा त्यांच्या लौकिकास साजेसा असा बनविण्यात आला असून पाहणार्‍यास, शिवाजी महाराज पुन्हा भूतलावर अवतरल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास वॅक्स म्युझियमचे संचालक ऍड. सुभाष कुमार यांनी व्यक्त केला आहे. उद्या अनावरणानंतर हा पुतळा लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.