मुख्य सामग्रीवर वगळा

व्हॅलेंटाइन...अडथळा अंतराचा..!

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community
दिवसभर मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेला काही तासांचा पण क्षणांप्रमाणे वाटणारा वेळ..भावी आयुष्य, मैत्रीच्या पुढच्या प्रवासात घालवायच्या आयुष्याची रंगविलेली स्वप्नं..रात्री झोपताना येणाऱ्या उद्याच्या कल्पनेचे कप्पे हृदयातून मनात साचवून झोपलेला तो किंवा ती...। खिडकीबाहेरून येणारा मंद वाऱ्याबरोबरचा सुवासाचा दरवळ..आणि, आणि सकाळी हळूच गालावर मोरपीस फिरल्याप्रमाणे त्याने किंवा तिने स्पर्श करून व्हॅलेंटाइन डे च्या दिलेल्या शुभेच्छा..।

एक काळ होता, त्या काळात घरातल्या महिलांनी परपुरुषाच्या समोर यायचे नाही. अगदी महत्त्वाचंच असल्यास अथवा संभाषण साधायचं असल्यास पडद्यामागे राहून बोलणी करायची..। या प्रघातामध्ये कालांतराने बदल होत जाऊन एकविसाव्या शतकात तर हे सगळं पडद्याआड गेलं आहे. वडील म्हणजे हिटलर वाटणाऱ्या मुलांना आता वडील म्हणजे मित्रच वाटू लागले आहेत. मुलगा आणि मुलगी यात फरक मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय.

मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलू नये, बघू नये..मुलीने मारुतीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करू नये अशा विचारांची बैठक आता बदललीये. सकाळी घराबाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम देव दर्शनासाठी मंदिरात जाणार्‍या मुला-मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोणताही किंतू, परंतु न बाळगता अथवा एकमेकांशी बोलल्यास घरचे काय म्हणतील? याचा विचार न करता एकमेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी एकत्र जमलेली मुलं-मुली बिनदिक्कत भेटून विचारांचे आदान प्रदान करतात. पूर्वीचे अत्यंत कडक असे घरातले वातावरण सुद्धा बदललेले असून अनेक घरांमध्ये बिनधास्त वातावरण असल्याचे जाणवते. शालेय शिक्षण पूर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशात जाणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या सुद्धा वाढते आहेच. माणसाचे बदललेले विचार अथवा विचारांच्या बैठकीत झालेले चांगले परिवर्तन याचे द्योतक असल्याचे मानावे लागेल.

शिक्षण घेताना एकमेकांची झालेली ओळख, या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन दोघांचा एकमेकांवर असलेला विश्वास, गरजा यांची जाणीव होऊन अनेकदा ही मैत्री आयुष्याच्या जोडीदाराच्या रूपात बदलल्याची उदाहरणं अगदी डोळ्यासमोरची आहेत. दिवसभर घराच्या बाहेर असल्यामुळे घरच्या सदस्यांपेक्षा किंबहुना मित्र-मैत्रिणीच जवळचे वाटून त्यांच्याशी सुख-दुःखं शेअर करून डोक्यावरचं टेन्शन घालवूनच घरी परत यायचं असा मनसुबा सुद्धा अनेक मुलं रचतात आणि तशी कृती करतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थोडं स्थैर्य आल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या लग्नाचा विषय घरात सुरू होतो..आणि सुरू होते काळजी...।   

आपलं शिक्षण सुरू असताना, इंटर्नशिप करताना, आर्टिकलशिप करताना आपल्या सोबत काम करणार्‍या सहकार्‍यांशी झालेली ओळख आणि या ओळखीतूनच झालेली मैत्री, मित्र-मैत्रिणीकडून एखाद्या यक्ष प्रश्नावर दिले गेलेले सोल्युशन आणि त्याचा प्रभाव या गोष्टी हृदयाच्या एका कप्प्यात नकळत केव्हा घर करून त्यात घट्ट बसतात हे कळतही नाही.

एकमेकांना भेटून घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा केव्हा भेट होईल या विचाराने जीव कासावीस होतो, आणि जाणीव होते प्रेमाची! सध्याचे दिनमान अतिशय खराब असून संपूर्ण आयुष्य ज्याच्याबरोबर काढायचं असतं असा जोडीदार निवडणे पूर्वीइतके सोपे राहिलेले नाही. वृत्तपत्र, टीव्हीवर सुद्धा फसवणुकीच्या बातम्या सतत प्रसिद्ध होत असल्यामुळे चिंता असतेच..! त्यातल्या त्यात माहितीतला मुलगा किंवा मुलगी असली तर चांगलंच अशी भूमिका मन घेऊ लागतं आणि
याला आकार मिळून स्वप्नं प्रत्यक्ष साकार होण्याची प्रतीक्षा सुरू होते. दोघांची भेट झाल्यानंतर मनाची स्पंदनं सुद्धा आतून बाहेर डोकावतात आणि विचार बाहेर येतात. वडील जरी फ्रेंडली वागत असले तरीही मुलांना सगळ्यात जवळची व्यक्ती आईच वाटते नां...।

भावी आयुष्य सुद्धा सोबत काढायचं दोघांनी ठरविल्यानंतर घरी सगळ्यात आधी आईला सांगितलं जातं. नंतर आई सुद्धा योग्य वेळ पाहून वडिलांना हे सांगते आणि पुढच्या हालचाली सुरू होतात. मुलगा किंवा मुलगी काही आई-वडिलांच्या पाहण्यात असतो तर काहींना नोकरीमुळे आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. बिचाऱ्या मुलांवर संस्कारच चांगले झालेले असतात नां...। परंतू पुढच्या सोपस्कारांसाठी क्वचित प्रसंगी हे संस्कार (सध्याच्या भाषेत) आडकाठी ठरतात. मुलगी दुसऱ्या घरी जाणार अथवा मुलगा दुसऱ्याच्या मुलीला सून म्हणून घरी आणणार असतो.  यापूर्वी ती दोघं मित्र-मैत्रीण असल्यामुळे काहीच न विचारलेल्या या दोन जीवांना आता काही नां काही विचारले जाते. आई-वडिलांनी नाही विचारले तरीही तिसऱ्या पिढीतली मंडळी यांना दशकापूर्वी महत्त्वाचा, प्रतिष्ठेचा समजला जाणारा...दोन हृदयांमध्ये अंतर निर्माण करणारा म्हणजेच जात हा मुद्दा विचारतात..आणि बिचाऱ्या तो-तिला चटकन गरगरल्यासारखे होते. सार्वजनिक ठिकाणी जातिभेद न मानणारे आजही हा प्रसंग स्वतःवर ओढवल्यास सहजासहजी मानायला तयार होत नाहीत, हे सत्य आहे. सत्य हे कटू असते म्हणतात नां, ते ही दोघं अनुभवतात. इतके दिवस आदराने पाहिल्या जाणाऱ्या या मुलाकडे, मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून आपल्या चांगल्या, हुशार मुलगा, मुलीच्या जीवनात का आले? या नजरेने कटाक्ष टाकून अक्षरशः दोघांना रडवेले केले जाते. तरीही, पालक मुलांच्या व्हॅलेंटाइन पुढे नतमस्तक होऊन त्यांना कधीही न तुटणाऱ्या गाठीत बांधणारेही पालक
या 21 व्या शतकात आहेत. यांचा आदर्श घेऊन आणि झपाट्याने पुढे सरकणाऱ्या काळाला वंदन करून फक्त आणि फक्त "मानव हीच जात" मानावी! नव्या युगाच्या प्रवाहाच्या दिशेने जाऊन काही अनुरूप नसलेले विचार बदलण्याची नितांत गरज आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012