एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

'डेक्कन-ओडिसी' तून ७५ परदेशी पर्यटकांनी घेतले महाराष्ट्र दर्शन
मुंबई, ता. २४ - महाराष्ट्राची लक्झरी ट्रेन 'डेक्कन-ओडिसी' ने बर्‍याच कालावधीनंतर नियमित सहलमार्गावर धाव घेतली. दिनांक १६ ते २३ फेब्रुवारी २०११ या कालावधीत या गाडीतून सुमारे ७५ परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राची सफर घडविली असल्याची माहिती आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) देण्यात आली.
'डेक्कन-ओडिसी' मुंबई, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, गोवा येथील प्रसिद्ध गिरजाघरे, समुद्रकिनारे, कोल्हापूर येथील शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, ताडोबा अभयारण्य, नाशिक येथील गोदावरी घाट आणि प्रसिद्ध मंदिरे इ. ठिकाणांना पर्यटकांनी भेट दिली. सहलीदरम्यान पर्यटकांचे ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलांचे दर्शन घेडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या हंगामात डेक्कन ओडिसीच्या ८ सहली करण्याचा प्रयत्न होता, तथापि पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नोव्हेंबर व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वेची अवास्तव हॉलेजची मागणी, सहलीच्या महसूलातील वाटा, एमटीडीसीचा सहलींवरील अन्य खर्च यामुळे सुारे २५.२१ लाख रुपयांचा तोटा झाला होता. याउलट फेब्रुवारीतील सहलीत पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रतिमाणशी प्रतिदिन ५०० डॉलर (रु. २२ ,५००/-) इतका आकार घेऊनही नफा कमी होणार आहे. महामंडळाने डेक्कन ओडिसीच्या काही सहली भाडेतत्वावर घेतल्या असून त्या नवी दिल्ली, आग्रा, सवाई माधोपूर, जयपूर, उदयपूर या मार्गावर धावत आहेत. या सहलींमधूनही पर्यटकांना किमान ३ दिवस महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद व अजिंठा या ठिकाणी फिरविण्यात येते.