एकूण पृष्ठदृश्ये

शुक्रवार, २१ जानेवारी, २०११

जिल्हा नियोजनाच्या आराखड्यात कुस्ती, कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी

मुंबई, ता. २० - देशी खेळांना चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन आराखड्यात कुस्ती आणि कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी, तसेच महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या मानधनासंदर्भातील वय आणि उत्पन्न अट शिथील करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या विविध मागण्या आणि कुस्ती स्पर्धांचे धोरण ठरविण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. युवक कल्याण आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी, वित्त विभाग मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड, क्रीडा व युवक संचालनालयाचे संचालक नरेंद्र सोपल, कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.
मानधनासाठी खेळाडूंचे वय ५० वर्षाहून अधिक असणे आवश्यक आहे, परंतू हिंदकेसरी, महान भारतकेसरी आणि रुस्तम-ए-हिंद किताब विजेत्यांना वय व उत्पन्नाची अट नाही. याच धर्तीवर महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यांना असणारी उत्पन्नची अट शिथील करावी अशी कुस्तीगिरांची मागणी होती. याविषयी प्रस्ताव वित्तविभागाकडे सादर करावा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा किताब विजेत्यांना एसटी बस प्रवास सवलत लागू करावी. शिवाय शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठीची एसटी प्रवास सवलत कूपनची मर्यादा ५०० रुपयांवरून एक हजार रुपयांपर्यंत वाढवावी असे निर्देश पवार यांनी दिले.
स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेस आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा विचार केला जाईल. यासाठी क्रीडामंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कुस्तीगिरांनी चर्चा करून आराखडा सादर करावा असेही पवार यांनी सांगितले.