एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १९ जानेवारी, २०११

अल्पसंख्यांक समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - अजित पवार

मुंबई, ता. १८ - अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी, अल्पसंख्यांक समाजातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री खान यांनी राज्यात या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी समित्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अल्पसंख्यांकांच्या विकासाबाबतच्या योजनांची चर्चा व्हायला हवी अशी मागणी केली. यानुसार श्री. पवार यांनी चर्चेबाबत दुजोरा देऊन आणि त्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करावे अशा सूचना दिल्या.
बैठकीस शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष नसीम सिद्दिकी, आमदार नवाब मलिक, शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव संजयकुमार, वित्तविभाग प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, महिला व बालकल्याण विभाग प्रधान सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.